close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दिवाळीच्या 'या' दिवसांचं महत्त्वं माहितीये?

वसुबारसपासून सुरु होतो हा प्रकाशमान सण....  

Updated: Oct 23, 2019, 10:57 AM IST
दिवाळीच्या 'या' दिवसांचं महत्त्वं माहितीये?

मुंबई : दिवाळी म्हणजे दिपावलीचा खरा अर्थ दिव्यांची उजळण. दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. गरिबांपासून ते अगदी श्रीमंतापर्यंत साऱ्यांसाठी दिवाळी हा उत्साहाचा, चैतन्याचा आणि भरपूर प्रकाशाचा असा सण आहे. दारासमोर कंदिर आणि पणती लावून या दिवाळी सण साजरा केला जातो. पाच दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या दिवाळी सणाचं खूप महत्व आहे. 

25 ऑक्टोबर - दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू कालदर्शिकेनुसार आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी धनाची देवता लक्ष्मी आणि धनाचे भांडार कुबेर यांची पूजा केली जाते. यंदा याच दिवशी धन्वंतरी जयंती देखील आली आहे. आयुर्वेदाचे प्रवर्तन करताना धन्वंतरी रूपात विष्णूने अवतार घेतला होता, अशी आख्यायिका आहे. 

धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त 

शुभ मुहूर्त – संध्याकाळी 7.08 ते रात्री 8.14 पर्यंत

प्रदोष काल - संध्याकाळी 5.39 ते रात्री 8.14 पर्यंत

धनत्रयोदशी पूजा विधी

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा विशेष पद्धतीने केली जाते. तसेच या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. कुबेराला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवैद्य ठेवला जातो. "ॐ ह्रीं कुबेराय नमः" आणि "धनवंतरी स्तोत्र" जप केला जातो. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो.

यंदा धनत्रयोदशी आणि वसूबारस देखील आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची देखील पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी गोधनाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते. या दिवशी गायीला नैवेद्य दाखवले जाते. 

27 ऑक्टोबर - या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी म्हणजे 27 ऑक्टोबर  दिवशी लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची बलीच्या बंदिवासातून सुटका झाली होती, अशी त्यामागची अख्यायीका आहे. लक्ष्मीच्या सुटकेमुळे या दिवशी सर्वांना आनंद झाला आणि हा आनंद साजरा केला जातो. 

लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात.

लक्ष्मीपूजन 2019 मुहूर्त 

दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.06 ते रात्री 8.37 ही मुहूर्ताची वेळ आहे. 

28 ऑक्टोबर - दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्याचा परंपरा आहे.  हा दिव बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच या दिवशी बलि आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होते. त्याचसोबत व्यापाऱ्याच्या नव्या वर्षाला ही या दिवसापासून सुरुवात होते. त्याचप्रमाणे विवाहित महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नान घालून औक्षण करता. नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी हा उत्साहाचा दिवस असतो. 

29 ऑक्टोबर - या दिवशी भाऊबीज आहे. भावा-बहिणीच्या नात्याचा दिवस. या दिवशी बहिण भावाचं औक्षण करते.