निवडणूक आयोग आज करणार मोदींच्या भाषणाचा फैसला
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना मोदींनी ही घोषणा केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते.
नवी दिल्ली: देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्याची घोषणा नुकतीच केली होती. भारतीय अंतराळ संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अंतराळातील उपग्रहाचा अचूक वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र 'मिशन शक्ती' अंतर्गत विकसित केले. जगातील मोजक्या देशांकडेच हे तंत्रज्ञान असल्याने भारतासाठी 'मिशन शक्ती'चे यश अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला संबोधित करताना ही घोषणा केली. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना मोदींनी ही घोषणा केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. विरोधकांनी मोदींच्या या कृतीवर आक्षेप घेत हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे दादही मागितली होती. यानंतर निवडणूक आयोगानेही नरेंद्र मोदी यांचे भाषण तपासण्याचे आदेश दिले होते. या भाषणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, याचा निकाल आज निवडणूक आयोग देणार आहे.
'मिशन शक्ती'वर डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या उपायुक्त संदीप सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यासाठी आम्ही दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओकडून या भाषणाचे तपशील मागवले आहेत. याची संपूर्ण तपासणी करून आम्ही संबंधित भाषणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, हा निर्णय देऊ, असे सक्सेना यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी ट्विट करून आपण लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी नोटाबंदीचा निर्णयही मोदींनी अशाप्रकारेच अचानकपणे जाहीर केला होता. त्यामुळे मोदी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर इस्रोने क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा मोदींनी केली होती. साहजिकच संपूर्ण देशभरात याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटली. मात्र, विरोधकांनी मोदींची ही कृती आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगत तीव्र आक्षेप नोंदवला होता.