पटना : बिहारच्या आरोग्य विभागातील अनेक धक्कादायक गोष्टी यापूर्वीही ऐकिवात आहेत. आता पुन्हा एकदा असाच प्रकार बिहारमधील Saharsa मध्ये समोर आला आहे. कुटुंब नियोजनासाठी आलेल्या एका महिलेच्या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटात बँडेज आणि कापसाचा तुकडा तसाच राहिल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर १३ दिवसांनी पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करत बँडेज आणि कापसाचा तुकडा बाहेर काढण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील सत्तर कट्टय्या येथील रकिया गावात राहणाऱ्या वंदना कुमारी या  १७ सप्टेंबर रोजी पंचगछिया पीएचसी रुग्णालयात दाखल झाल्या. कुटुंब नियोजनांतर्गत डॉक्टरांनी महिलेवर शस्रक्रिया केली. पण शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवसापासूनच ताप, उलटीसह महिलेची तब्येत बिघडू लागली.  


८ दिवसांनंतर शस्त्रक्रियेदरम्यान केलेले टाके काढण्यात आले. त्यावेळी पोटात इन्फेक्शन झाले होते. महिलेची प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यावेळी पोटातून  बँडेज आणि कापसाचा तुकडा काढण्यात आला. 


महिलेच्या कुटुंबियांनी  पंचगछिया पीएचसी रुग्णालयातील डॉक्टरांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून दोषीविरोधात कारवाई करण्यात येईल असे, सिव्हिल सर्जन डॉ. ललन प्रसाद सिंह यांनी सांगितले.


बिहारमधील आरोग्य विभाग सुधारणा करत असल्याचा दावा करतात. परंतु वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे आरोग्य विभागाचे हे दावे फोल ठरत असल्याचेच दिसते. या प्रकारानंतर आता बिहारमधील सरकारी रुग्णालयात, रुग्णांवर होणाऱ्या उपचाराबाबत  प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.