नवी दिल्ली: भाजपमध्ये नितीन गडकरी हेच एकमेव हिंमत असणारे नेते आहेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याला नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मात्र, मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की, एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असूनही तुम्हाला सरकारवर हल्ला करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारवर निशाणा साधण्यासाठी तुम्ही कुणाचातरी आधार शोधत आहात, हेच या सरकारचे मोठे यश असल्याचा टोला गडकरी यांनी लगावला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी नागपुरात पार पडलेल्या अभाविपच्या एका कार्यक्रमात बोलताना 'जो घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार?', असे विधान केले होते. यावेळी गडकरी यांनी थेट कुणाचे नाव घेतले नव्हते. मात्र, गडकरी यांच्या या विधानाचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात २०१९ मध्ये मोदींना पर्याय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी यांच्या नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या प्रत्येक वक्तव्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. 



याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींचे कौतुक केले होते. नितीन गडकरी भाजपमधील हिंमत असलेले एकमेव नेते असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच कृपया भविष्यात आणखी काही विषयांवर भाष्य करा, असे सांगत राहुल गांधी यांनी एक यादी दिली होती. यामध्ये राफेल-अनिल अंबानी, शेतकऱ्यांची दुरावस्था, देशातील स्वायत्त संस्थांची गळचेपी याचा उल्लेख होता. एवढेच नव्हे तर रोजगारासंदर्भातही गडकरी यांनी भाष्य करावे, असे आणखी एक ट्विट राहुल यांनी केले होते.