आपचे खासदार संजय सिंह यांना अटक, ED कडून मोठी कारवाई
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घऱी शोधमोहीम राबवल्यानंर सक्तवसुली संचलनालयाने त्यांना अटक केली आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घऱी शोधमोहीम राबवल्यानंर सक्तवसुली संचलनालयाने त्यांना अटक केली आहे. बुधवारी ईडीने संजय सिंग यांच्या घऱावर छापेमारी केली होती. दिल्लीतील दारू धोरण घोटाळा प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने संजय सिंह यांना बेड्या ठोकल्या आहेत. अनेक तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली. याआधी ईडीने या घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल केली होती. ज्यामध्ये संजय सिंग यांचं नाव होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय सिंग यांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी संजय सिंग यांना अटक केली. यानंतर निमलष्करी दलाच्या जवानांना तानात करण्यात आलं आहे. संजय सिंग यांच्या अटकेची माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.
संजय सिंग यांना घराच्या मागच्या गेटने नेलं जाण्याची शक्यता आहे. यानंतर दिल्लीमधील ईडीच्या मुख्य कार्यालयात नेलं जाईल. तिथे ते रात्रभर लॉक असतील. यानंतर सकाळी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. तिथे संजय सिंग यांच्या कोठडीची मागणी केली जाईल.
एक दिवस आधी दिल्ली न्यायालयाने वायएसआर पक्षाचे खासदार श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा राघव मागुंटा आणि व्यापारी दिनेश अरोरा यांना अबकारी धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी दिनेश अरोडा या प्रकरणातील मुख्य दुवा असल्याचं मानलं जात आहे. ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये आरोप केला होता की, दिनेश अरोराने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या बैठकीत संजय सिंगही उपस्थित होते. दिनेश अरोराने चौकशीत सांगितलं होतं की, सर्वात आधी एका कार्यक्रमात त्याची संजय सिंग यांच्याशी भेट झाली होती. यानंतर तो मनिष सिसोदिया यांच्या संपर्कात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली निवडणुकीआधी आप नेत्यांकडून निधी जमा करण्याचा हा प्रयत्न होता.