Lion In Ex PM Indira Gandhi Rally: निवडणूक आयोगाने मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या 5 राज्यांमधील निवडणुकींची घोषणा नुकतीच केली आहे. आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदावरांच्या यादीपासून कोणाला तिकीट द्यावं, का द्यावं यासंदर्भातील फायद्या-तोट्याच्या गणितांची जुळावजुळव केली जात आहे. तिकीट नाकारल्यानंतर अनेकजण बंडखोरी करत आपल्याच पक्षाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. अशावेळी आरोप प्रत्यारोप फार मोठ्या प्रमाणात होतात. मात्र एका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्याही पुढे जात एका उमेदवाराने चक्क माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रचारसभेमध्ये सिंह सोडला होता. नेमकं काय घडलं होतं आणि पुढे काय झालं जाणून घेऊयात...


नेमकं घडलेलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1974 साली ही घटना घडली. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती. निवडणुकीसाठीचा प्रचार अगदी जोरात सुरु होता. त्याच दरम्यान दिल्लीला लागून असलेल्या गोतमबुद्ध नगरमधील दादरीमध्ये इंदिरा गांधींची एक सभा घेण्याचं ठरलं होतं. इंदिरा गांधींची ही सभा गुर्जर समाजाचे नेते रामचंद्र विकल यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती. इंदिरा गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्ष पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये चौधरी चरण सिंह यांचा वाढवता प्रभाव पाहून चिंतेत होते. गुर्जर समाजातील नेता म्हणून चौधरी चरण सिंह यांना पर्याय म्हणून रामचंद्र विकल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. रामचंद्र विकल त्यावेळी बागपतचे खासदार होते. 


इंदिरा गांधींकडे केलेली ही मागणी


दादरी मतदारसंघ शेतकरी नेते बिहारी सिंह बागी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. बिहारी सिंह बागी येथील स्थानिक नेते होते तसेच इंदिरा गांधींचे निकटवर्तीय होते. बागी यांनाही उमेदवारी हवी होती. मात्र इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विकल यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या बिहारी सिंह बागी यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. बिहारी सिंह बागी यांना 'सिंह' हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. मला तिकीट दिलं नाही याबद्दल काही म्हणणं नाही. पण किमान तुम्ही विकल यांच्यासाठी प्रचारसभा घेऊ नये असा निरोप बिहारी सिंह बागी यांनी इंदिरा गांधींना पाठवला. मात्र इंदिरा गांधीनी याकडेही दुर्लक्ष केलं.


...अन् सभेत सिंह सोडला


दादरीमधील रुपबास गावात जन्म झालेल्या बिहारी सिंह बागी यांनी इंदिरा गांधींची ही प्रचारसभा रोखण्यासाठी एक योजना आखली. दादरी यांना गाझियाबादला लागू असलेल्या परिसरामध्ये एक सर्कस सुरु होती असं समजलं. बिहारी सिंह बागी यांनी त्या काळामध्ये 500 रुपये भाडं देऊन या सर्कसमधून एक सिंह मागवला. पिंजऱ्यामध्ये हा सिंह आणण्यात आला. जेव्हा इंदिरा गांधींची सभा सुरु झाली तेव्हा बिहारी सिंह बागी हे या सिंहाच्या पिंजऱ्यासहीत सभास्थळी पोहोचले. सभास्थळी पोहचल्यानंतर बिहारी सिंह बागी यांनी पिंजऱ्याचं दार उघडलं आणि सभा सुरु असलेल्या मैदानात सभा ऐकण्यासाठी आलेल्यांची एकच पळापळ सुरु झाली. सभेसाठी जमा झालेली गर्दी पांगली. या गोंधळामुळे इंदिरा गांधींना अवघ्या 5 मिनिटांमध्ये सभा संपवावी लागली. 


निवडणुकीत पराभूत झाले पण काँग्रेसचाही झाला पराभव


ही निवडणूक बिहारी सिंह बागींना जिंकता आली नाही. मात्र काँग्रेसचे उमेदावर रामचंद्र विकल यांनाही विजय मिळाली नाही. बागी हे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचेही निकटवर्तीय होते. त्यांचे पुत्र यतेंद्र कसाना यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांमध्ये बिहारी सिंह बागी लोकप्रिय होते. 1992 साली एका शेतकरी मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते.


आता उभारणार पुतळा


1943 साली जन्म झालेल्या बिहारी सिंह बागी यांचा वयाच्या 77 व्या वर्षी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झालं. 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावामध्ये म्हणजे रुपबासमध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. चौधरी बिहारी सिंह ट्रस्टनुसार केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित असतील. बिहारी सिंह बागी यांचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असं या ट्रस्टच्या अध्यक्ष रजनी देवी यांनी म्हटलं.