केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्शव यांची 5G संदर्भात मोठी घोषणा! जाणून घ्या...
केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे.
BSNL to roll out 5G: BSNL ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे. अशी माहिती आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नवीन टॉवर उभारण्यासाठी सरकारने 36,000 कोटी रुपये मंजूर केल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच 5G सेवा सुरू केली आहे. 5G सेवांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांच्या आयटी मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केलं आहे. या बैठकीत जवळपास सर्वच राज्यांच्या आयटी मंत्र्यांनी कनेक्टिव्हिटी हे आव्हान असल्याचं सांगून याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत सर्व राज्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत 6 व्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या निमित्ताने होत होती. जोपर्यंत कनेक्टिव्हिटीचा संबंध आहे, राज्यांना कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हेवी लिफ्टिंग करावं लागेल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
बीएसएनएलची सेवा (BSNL Service) अधिक चांगली होईल
मंत्र्यांनी 8 महिन्यांत PM गति शक्ती मास्टर प्लॅनमध्ये सामील झाल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे कौतुक केलं आणि सांगितलं की, एकत्र काम केल्याने चांगले परिणाम मिळत आहेत. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची पुनर्स्थापना करून कनेक्टिव्हिटीची समस्या बर्याच प्रमाणात सोडवली जाईल, असा विश्वास या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले. ते म्हणाले, "बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी आमच्याकडे 1.64 लाख कोटी रुपये आहेत जे त्यांच्या भांडवली गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञान अपग्रेडेशनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत."
अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार
याआधी केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली होती की, येत्या 6 महिन्यांत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. इंडिया मोबाईल काँग्रेसनंतर लगेचच त्यांनी ही घोषणा केली.