Smartwatch द्वारे FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? पाहा काय आहे सत्य
तुम्हीही हा व्हिडीयो पाहून दचकला असाल, मात्र हा व्हिडीयो किती खरा आहे याचा विचार तुम्ही केलाय का?
मुंबई : आजच्या काळात सोशल मीडियावरून, व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून खूप माहिती मिळते. बहुतेक लोक ही माहिती पाहतात आणि फॉरवर्ड करतात. परंतु त्याची वस्तुस्थिती तपासणं फार कमी वेळा होतं. नुकतंच FASTag च्या घोटाळ्याचा एक व्हिडिओ व्हाट्सएप, फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होताना दिसतोय. तुम्हीही हा व्हिडीयो पाहून दचकला असाल, मात्र हा व्हिडीयो किती खरा आहे याचा विचार तुम्ही केलाय का?
सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ
सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये दोन लोकं कारमध्ये बसून कार साफ करण्यासाठी आलेल्या एका लहान मुलाशी बोलतात. गाडी साफ केल्यानंतर मुलगा पैसे घेत नाही तेव्हा त्या दोघांपैकी एकजण त्याच्या मागे धावतो कारण मुलाने हातात स्मार्टवॉच घातलेलं असतं.
या व्हिडीओतील दोघांपैकी एकाने सांगितलंय, रस्त्यावर चालणारी मुलं जी गाडी स्वच्छ करतात किंवा भीक मागतात, त्यांनी खास स्मार्टवॉच घातलंय. या वॉचमध्ये पहिल्यापासूनच एक स्कॅनर आहे जे वाहनावर असलेल्या FASTag स्टिकरला स्कॅन करतं. अशा प्रकारे तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून किंवा ई-वॉलेटमधून पैसे काढले जातात.
हा व्हायरल व्हिडीओ किती सत्य?
जर तुम्हीही हा व्हिडिओ पाहिला असेल, तर हा फेक आहे आणि त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. ऑनलाइन पेमेंट अॅप पेटीएमने स्वतः याची खात्री केलीये.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, FASTag पेमेंट केवळ अधिकृत व्यापाऱ्यांद्वारेच पूर्ण केलं जाऊ शकतं आणि FASTag पूर्णपणे सुरक्षित आहे. हा व्हायरल व्हिडिओ fake असून केवळ चुकीची माहिती पसरवत असल्याचं त्यांनी ट्विटरवर स्पष्टपणे म्हटलंय.
दरम्यान नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देखील हा व्हिडीयो खोटा असल्याचा दावा केला आहे.