नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी (farmer) नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली. या बैठकीतून कोणताही निर्णय झाला नाही. आता शेतकऱ्यांची भूमिका अधिक कठोर झाली आहे. केंद्र सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या (Farmers protest delhi) नेत्यांमधली बैठक संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला संपली. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले. त्या बैठकीत इतर मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच एपीएमसी मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासनही तोमर यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. आज झालेल्या शेतकऱ्यांसोबतच्या चौथ्या फेरीतही तोडगा काढण्यात अपयश आले. नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्यामुळे हा तिढा वाढतच चालला आहे. मात्र आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.


दिल्लीतील विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एकूण ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पियूष गोयल बैठकीला उपस्थित होते. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातही चर्चा झाली.