Farmers Protest : शेतकऱ्यांना आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता
कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्याची शक्यता आहे. हमीभावाबाबत सरकार आज लिखित आश्वासन देईल अशी सूत्रांची माहिती आहे. तसंच बाजार समितीबाबतही केंद्र सरकारकडून आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे नेते आणि सरकारमध्ये चर्चेची पाचवी फेरी थोड्याच वेळात सुरू होत आहे. मात्र शेतकरी ठिकठिकाणी आजही आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. तसेच दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाची धग अधिक वाढवण्यात येईल तसेच अधिकाधिक रस्त्यांवर चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनांना आक्षेप असलेल्या कृषी कायद्यातील मुद्द्यांवर सर्वमान्य तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मात्र संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून तीन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर संघटना ठाम असून आजच्या बैठकीत काय घडते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.