मोठी बातमी: प्रिया दत्त यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार
२०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
मुंबई: काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. प्रिया दत्त यांनी सोमवारी एक निवेदन जारी करून ही घोषणा केली. माझ्या आयुष्यातील गेली काही वर्षे उत्कंठावर्धक आणि खूप काही शिकवणारी होती. मात्र, या सगळ्यात मला राजकीय व वैयक्तिक जीवनाचा मेळ साधण्यात बरीच कसरत करावी लागत आहे. तरीही मी शक्य तितकी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सगळ्यामुळे माझ्या आयुष्यातील इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे.
प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ईमेल पाठवून आपला निर्णय कळवला आहे. प्रिया दत्त या दोनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, यावेळी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे मुंबईच्या उत्तर-मध्य मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यास जोरदार विरोध झाला होता. ऑक्टोबर महिन्यात यासंदर्भात झालेल्या बैठकीवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. जर त्यांना २०१९ सालची निवडणूक लढवायची होती तर त्यांनी पराभवानंतर मतदारसंघात लक्ष घालून तेथील जनतेची कामे केली पाहिजे होती. प्रिया दत्त यांनी गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात मोर्चेबांधणी तर सोडाच पण साधा कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवलेला नाही, असे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. दोन्ही पक्ष २०-२० जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. उर्वरित आठ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.