नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर राजकीय समीकरणांसोबतच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारे संबंधही बदलले. तणावाच्या या परिस्थितीविषयी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. पाकिस्तानकडून भारतावर अणुबॉ़म्ब हल्ला करण्यासंबंधीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. सोबतच त्यांनी पाकिस्तानला भारतापासून सावध राहण्याचाही इशारा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे संबंध अतिशय गंभीर वळणावर पोहोचल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 'इथे कोणत्याही प्रकारचा अणुबॉम्ब हल्ला होणार नाही. कारण, पाकिस्तानने एका अणुबॉ़म्बचा हल्ला भारतावर केला तर शेजारी राष्ट्र त्याला उत्तर म्हणून २० अणूबॉम्बचा हल्ला करतील. ज्यामुळे आधीच त्यांनी आमच्यावर २० अणुबॉम्बचा हल्ला करु नये यासाठी आम्हाला त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब हल्ले करावे लागतील', असं म्हणत त्यांनी तुम्ही ५० अणुबॉम्बचा वापर करत प्रथम भारतावर हल्ला करण्यासाठी तयार आहात का, असा प्रश्न आपल्या राष्ट्राला उद्देशून उपस्थित केला.  


पुलवामा येथील आत्घाती हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी मुशर्रफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याआधी त्यांनी पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची बाब स्वीकारत या एकाच मुद्द्यावरुन हल्ल्यात पाकिस्तानला दोषी ठरवू नका असंही स्पष्ट केलं होतं. त्यासोबत इस्राईल पाकिस्तानशी असणरे  संबंध प्रस्थापित करु इच्छित असल्याची बाबही त्यांनी मांडली. त्यांचं एकंदर वक्तव्य, पाकिस्तानची पुलवामा हल्ल्यावर मांडण्यात आलेली भूमिका आणि दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये आणखी तणाव न आणता आणखी एका संधीची मागणी करणारे इम्रान खान यांच्या भूमिकांना पुढे कोणतं वळण मिळतं हे पाहणं दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.