श्रीनगर : पुलवामा हल्लाचं सीसीटीव्ही फुटेज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. श्रीनगर जम्मू महामार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकणाऱ्या इको कारचं फुटेज एनआयएच्या हाती लागलं आहे. आत्मघातकी हल्लेखोर आदील कार चालवत असल्याचं या फुटेजमधून स्पष्ट होतं आहे. या फुटेजच्या आधारे कारच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. एनआयएमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कार २०१०-११ सालची होती आणि तिला नवा रंग देण्यात आल्याचं देखील कळतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएला आतापर्यंत घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत. ज्या गाडीने हल्ला करण्यात आला ती गाडी कोणाची होती याचा तपास घेण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे.


१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. जम्मू येथून श्रीनगर जात असताना सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला होता. स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली होती. त्यानंतर झालेल्या स्फोटात ४० जवान शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशभरात यामुळे संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी अनेक जण करत आहेत.