नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे भारतातही सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे भाव पडले. पेट्रोलचे दर प्रतिलिटर २० पैसे तर डिझेलचे दर प्रतिलिटर १५ पैशांनी कमी झाले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७५.१८ रुपये इतका होता तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६६.५७ इतका होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलच्या दराचा चालू वर्षातील हा निच्चांकी भाव आहे. ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप ८५ डॉलरपर्यंत जाऊन पोहोचल्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. मुंबईमध्ये ४ ऑक्टोबर रोजी पेट्रोलचे दर ९१.३४ रुपये इतके होते. त्यावेळी केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर सरकारने पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 


सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रतिपिंप ५३ डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाचे उत्पादन आणि त्याचा पुरवठा जास्त असल्यामुळे त्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. 


भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे रुपया आणि डॉलर यांचे दर त्याचप्रमाणे १५ दिवसांतील कच्च्या तेलाच्या दराची सरासरी यावरून निश्चित केले जात असतात.