नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नुकताच काश्मीरमध्ये दौरा केला होता. यावेळी शोपियामधील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या फोटोत अजित डोवाल स्थानिक नागरिकांसोबत जेवताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी काश्मिरी जनतेशी संवाद साधला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अजित डोवाल यांचे कौतूक केले होते. तसेच काश्मीरमधील जनता अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर नाराज असल्याचे सांगणाऱ्यांनाही नेटकऱ्यांनी फटकारले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी अजित डोवाल यांच्यावर टीका केली आहे. पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येते, अशी खोचक टीका त्यांनी केली. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुलाम नबी आझाद गुरुवारी श्रीनगरमध्ये जाणार आहेत. मात्र, त्यांना विमानतळावरच रोखले जाण्याची दाट शक्यता आहे.


उतू नका- मातू नका; अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर मोदींचा मंत्र्यांना सल्ला


अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी रस्त्यावरील लोकांशी संवाद साधला. यानंतर या लोकांनी आग्रह केल्यामुळे डोवाल यांनी त्यांच्यासोबत बिर्याणीचा आस्वाद घेतला. 


अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून सध्या काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावेळी ते जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे आणि विभाजनाविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. 


काश्मीरच्या नागरिकांसोबत जेवण करताना NSA अजित डोवाल यांचा व्हिडिओ व्हायरल