पणजी : मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय परिस्थिती तापली होती. पण रात्री २ वाजता प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. राज्‍यपाल मृदुला सिन्‍हा यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. प्रमोद सावंत यांनी ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं. सोबतच ते मनोहर पर्रिकर यांचं स्वप्न पूर्ण करतील आणि गोव्यातील लोकांची सेवा करतील असं म्हणताना ते भावूक झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं की, मला मोठी जबाबदारी मिळाली आहे. मी गोव्याचा विकास करण्यासाठी मनोहर पर्रिकर यांचा दृष्टिकोण समोर ठेवेल. आम्ही सगळे त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करु. त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरचं संपूर्ण श्रेय मनोहर पर्रिकरांनात दिलं. त्यांनी म्हटलं की, मी आज जे काही आहे ते फक्त मनोहर पर्रिकर यांच्यामुळे आहे. पर्रिकर यांच्यामुळेच राजकारणात अल्याचं देखील त्यांनी पुढे म्हटलं.


राजभवन येथे आयोजित या शपथविधी कार्यक्रमात गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन धावलिकर यांच्यासह ११ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. 



मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. 



गोव्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसचे १४ आमदार आहेत. भाजपचे १२ आमदार आहे. भाजपने येथे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यासह ३ अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केलं.


पर्रिकर यांच्या निधनानंतर सध्या गोवा विधानसभेची सदस्य संख्या ३६ आहे. काँग्रेसचे २ आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोप्ते यांनी मागच्या वर्षी राजीनामा दिला होता. तर भाजप आमदार फ्रांसिस डिसूजा यांचंही निधन झालं आहे.