सोन्या-चांदीच्या दरांत मोठी वाढ
नववर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ
मुंबई : सोन्या-चांदीच्या दरांत शुक्रवारी विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवासांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात ६०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. MCXवर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ३९ हजार ९२० रुपयांवर पोहचली आहे. तर MCXवर एक किलो चांदीच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव ४७ हजार ५०८ रुपये प्रति किलोवर पोहचला आहे.
नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठे बदल पाहायला मिळाले. २ जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतीत ९६ रुपयांची वाढ पाहायला मिळाली. तर एक किलो चांदीच्या दरात २१ रुपयांची वाढ झाली होती. मुंबईत २२ कॅरेट सोन्यााचा दर जवळपास ३८ हजार ७०० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ३९ हजार ७०० रुपये इतका आहे.
जळगावमध्ये सोन्याच्या किंमतीत ९०० रुपयांची वाढ झाली आहे.
आखाती देशांमध्ये वाढत्या तणावामुळे हे दर वाढल्याची माहिती मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती वाढ झाल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
एक्सिस सिक्योरिटीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.