Corona संकटात गरीब आणि कामगार वर्गासाठी सरकारची मोठी घोषणा
कोरोना संकटाला सामोरे जात असताना गरीब आणि कामगार वर्गासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : कोरोना संकटाला सामोरे जात असताना गरीब आणि कामगार वर्गासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जून 2021 मध्ये मोफत धान्य देणार आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारत सरकार या उपक्रमासाठी 26 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.
कोरोना संकटामुळे देशातील बर्याच राज्यांत कठोर निर्बंध लादण्यात आले असताना केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. या निर्बंधामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना संकटामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. पीएम मोदी यांनी कोरोनाचं संकट अधिक वाढत असताना ही बैठक आयोजित केली होती.
केंद्र सरकार म्हणते की त्याची प्रमुख प्राथमिकता ही आहे की साथीच्या कठीण काळात घरातील चूल विझता कामा नये. मजूर आणि गरीब यांना उपाशी झोपण्याची गरज नाही. याच उद्देशाने सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू होताच पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली होती. या अंतर्गत गरीबांना आर्थिक मदत केली गेली. इतकेच नाही तर केंद्र सरकारने लॉकडाऊन दरम्यान 80 लाख लोकांना मोफत रेशनही दिले.
तज्ज्ञांचे मत आहे की, साथीच्या आणि लॉकडाऊन विरूद्ध लढा देताना शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांसाठी सरकारच्या दोन मोठ्या योजना वरदान ठरल्या आहेत. प्रथम गरीबांना आर्थिक मदत पुरविली गेली आणि दुसरे म्हणजे मोफत रेशन योजना… यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या बँक खात्यात रोख रक्कम तसेच गरीबांच्या स्वयंपाकघरात मोफत रेशन मिळू शकले. एवढेच नाही तर मनरेगाच्या माध्यमातून कामगार वर्गालाही दिलासा मिळाला.