जम्मू-काश्मीरमध्ये `राष्ट्रपती` नाही तर `राज्यपाल` राजवट लागू होते कारण...
राज्यातील मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळलंय
जम्मू काश्मीर : सत्ताधारी पीडीपीसोबत तीन वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपनं 'काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाचं' कारण पुढे करत आपलं समर्थन मागे घेतलंय. त्यामुळे राज्यातील मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळलंय. जम्मू - काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर राज्यात राज्यपाल शासन लागू झालंय.
राज्यात आठव्यांदा राज्यपाल शासन
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, गेल्या ४० वर्षांत आठव्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू होण्याची ही आठवी वेळ आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा १९७७ मध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आलं होतं.
सद्य राज्यपाल एन एन वोहरा यांच्याच कार्यकाळातील राज्यपाल शासनाची ही चौथी वेळ आहे. वोहरा २५ जून २००८ रोजी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी विराजमान झाले होते.
'राज्यपाल' राजवट
देशातील इतर राज्यांत राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरले किंवा राज्य सरकार अयशस्वी ठरलं तर राज्यात 'राष्ट्रपती' राजवट लागू केली जाते. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये मात्र 'राष्ट्रपती' राजवट लागू होत नाही... तर इथे 'राज्यपाल' राजवट लागू केली जाते.
जम्मू-काश्मीर : विशेष राज्य
- भारताच्या संविधानात कलम ३७० नुसार जम्मू - काश्मीरला विशेष दर्जा दिला गेलाय. यानुसार, जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र झेंडा आणि प्रतिक चिन्हही आहे.
- हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 'राज्याचं संविधान आणि अधिनियम' आहेत
- देशातील इतर राज्यांत संविधानाच्या कलम ३५६ नुसार 'राष्ट्रपती' राजवट लागू केली जाते.
- परंतु, जम्मू-काश्मीरच्या संविधानाच्या कलम ९२ नुसार राज्यात सहा महिन्यांसाठी राज्यपाल राजवट लागू केली जाऊ शकते. परंतु, यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक आहे.
- राज्यपाल राजवटीच्या काळात विधानसभा निलंबित राहते किंवा विधानसभा भंग केली जाते. या सहा महिन्यांच्या कालावधीत संविधानिक यंत्रणा लागू झाली नाही तर राज्यपाल राजवटीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीचा इतिहास...
- पहिल्यांदा : २६ मार्च १९७७ ते ९ जुलै १९७७ (१०५ दिवस)
- दुसऱ्यांदा : ६ मार्च १९८६ ते ७ नोव्हेंबर १९८६(२४६ दिवस)
- तिसऱ्यांदा : १९ जानेवारी १९९० ते ९ ऑक्टोबर १९९६ (६ वर्षांत - २६४ दिवस)
- चौथ्यांदा : १८ ऑक्टोबर २००२ ते २ नोव्हेंबर २००२ (१५ दिवस)
- पाचव्यांदा : ११ जुलै २००८ ते ५ जानेवारी २००९ (१७८ दिवस)
- सहाव्यांदा : ९ जानेवारी २०१५ ते १ मार्च २०१५ पर्यंत (५१ दिवस)
- सातव्यांदा : ८ जानेवारी २०१६ ते ४ एप्रिल २०१६ (८७ दिवस)
- आठव्यांदा : १९ जून २०१८ पासून... आत्तापर्यंत...