नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोमवारी संसदेत काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, हा प्रस्ताव मांडताना मोदी सरकारने काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले असते तर अधिक चांगले झाले असते. याउलट सरकारने त्यांना बाजूला सारून निर्णय घेतला असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाल्यास अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी म्हटले की, काश्मीरची संस्कृती वेगळी आहे. तेथील जनता भारताशी एकनिष्ठ आहे. जम्मू-काश्मीरबाबत इतका मोठा निर्णय घेताना जनतेला आणि तेथील नेत्यांना विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते. 


गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे लोक भारताशी एकनिष्ठ आहेत. मात्र, केंद्र सरकारने परस्पर हा निर्णय घेतल्याने या लोकांची स्थानिक तरुणांना समजूत काढण्याची ताकद कमी होईल, असे पवार यांनी म्हटले. 


मात्र, आता काश्मीरमध्ये शांतता राहील आणि सरकारने जे केलंय, त्यामुळे काश्मीरमधील प्रश्न सुटतील अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.


उरल्यासुरल्या बेड्या तुटल्या; संपूर्ण भारत स्वतंत्र झाला- उद्धव ठाकरे


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानले. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत स्वतंत्र झाला. शिवसेनेने इतके वर्षे हदयाशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाले. आजचा दिवस पाहायला बाळासाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा व्हायला हवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.