वाराणसी : भारताचे पंतप्रधान आणि वाराणसी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस आपल्या मतदारसंघात असतील. आज दुपारी त्यांचं वाराणसीमध्ये आगमन होईल. त्यानंतर शहरात त्यांचा रोड शो होणार आहे. तसंच ते संध्याकाळी गंगा आरतीमध्येही सहभागी होतील. शुक्रवारी २६ तारखेला पंतप्रधान आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी दुपारी वाराणसीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची रोड शो लंका स्थित महामना मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून सुरू होईल. जवळपास ७ किलोमीटरच्या अंतरावर ४ तासांचा प्रवास करून पंतप्रधान दशाश्वमेध घाटावर दाखल होणार आहेत. इथल्या फ्लोटिंग प्लॅटफॉर्महून गंगेचं वैदिक रितीनं पूजन करून ते भव्य गंगा आरतीसाठी सहभागी होतील. त्यानंतर राजेंद्र प्रसाद घाटावर बनवल्या गेलेल्या मंचावरून पंतप्रधान भाषण करणार आहेत. 


घाट रंगले भगव्या रंगात


भगव्या रंगात रंगलेल्या घाटावर बनारसचं मंदिर, कला आणि संस्कृती चित्रित करण्यात आलीय. इथं लावण्यात आलेलं १०० फूट उंच पंतप्रधानांचा फोटो दूरवरूनही दिसतोय. हा तोच घाट आहे जिथून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगा सफाई अभियानाचा शुभारंभा केला होता. 


भव्य सुरक्षा व्यवस्था तैनात


पंतप्रधानांच्या या भव्य रोड शोसाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आलीय. यासाठी २१ एडिशनल एसपी, ५५ सीओ, ६२० इन्स्पेक्टर, ३१०० कॉन्स्टेबल, १२ कंपनी पीएसी, १६ कंपनी पॅरामिलिटरी फोर्स, १५० महिला शिपाई यांच्यासमवेत एसपीजी आणि एलआयूच्या टीम्स तैनात करण्यात आल्यात.



शुक्रवारी अर्ज करणार दाखल


शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते पहिल्यांदा वाराणसीतल्या काळभैरव मंदिरात पूजा करतील. त्यानंतरच ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतंय.  वाराणसीचे रक्षक अशी काळभैरवाची ओळख आहे. त्यामुळं मोदी पहिल्यांदा पूजा करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सकाळी सव्वा अकरा वाजता काळभैरव मंदिरात पूजा करतील त्यानंतर साडेअकरा वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील