Omicron : ओमिक्रॉनने चिंता वाढवल्या असताना लस घेतलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा
कोरोनाचा नवा प्रकार धुमाकूळ घालत असताना लसीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.
नवी दिल्ली : कोरोनावरील लस (Vaccine) घेतलेल्या लोकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतातील लसीकरणाच्या जलद गतीमुळे कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Covid 19) संसर्गाची तीव्रता कमी होऊ शकते. मंत्रालयाने म्हटले आहे की, ओमिक्रॉन (Omicron verient) भारतासह आणखी इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता आहे, परंतु संक्रमण वाढण्याचे प्रमाण आणि तीव्रता अद्याप अस्पष्ट आहे.
"भारतातील लसीकरणाचा वेग आणि उच्च सेरोपॉझिटिव्हिटीचा पुरावा म्हणून डेल्टा प्रकाराचा उच्च धोका लक्षात घेता, रोगाची तीव्रता कमी असल्याचा अंदाज आहे. वैज्ञानिक पुरावे अद्याप विकसित होत आहेत," असं आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाने अधोरेखित केले की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निरीक्षण केलेल्या उत्परिवर्तनांवर आधारित ओमिक्रॉन हा चिंतेचा एक प्रकार आहे.
उपलब्ध लसींसह कोविड-19 विरूद्ध लसीकरणावर जोर देण्यात आला, कारण तो गंभीर आजारांपासून संरक्षण प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेच्या संशोधकांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासातून असे पुढे आले आहे की ओमिक्रॉन प्रकार पूर्वीच्या विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरतो.
अभ्यासानुसार, बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा VOCs मध्ये पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता तिप्पट आहे.
भारतात गेल्या 24 तासांत 9,216 नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत. सक्रिय प्रकरणे 1 लाखांच्या खाली आली आहेत. भारतात लसीकरणाने 125 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
कोरोनाचा हा नवा प्रकार अधिक पसरू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळण्याची आवश्य़कता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.