नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिरासाठी देशविदेशातून देणगी गोळा करण्यात आली. संघ आणि संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून रामलल्लासाठी दान मागितलं... या अभियानाला मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. अपेक्षेपेक्षा जवळजवळ दुप्पट देणगी गोळा झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामजन्मभूमी अयोध्येमध्ये रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहतंय. मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टनं जगभरातील रामभक्तांकडून देणगी स्वरुपात मदत गोळा करण्यासाठी मोठं अभियान राबवलं. 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियाला प्रचंड मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. समाजाच्या सर्व वर्गातल्या, सर्व जाती-धर्मांच्या रामभक्तांनी भरभरून दिल्यामुळे हे शक्य झाल्याचं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी म्हटलं आहे.


राम मंदिरासाठी तब्बल 2100 कोटी जमा झाले आहेत. राम मंदिरासाठी या अभियानाच्या माध्यमातून 1100 कोटी जमा होण्याची अपेक्षा होती. पण रामभक्तांची मंदिरासाठी भरभरून मदत केल्याचं दिसतं आहे.


ट्रस्टच्या अंदाजापेक्षा तब्बल 1 हजार कोटी रुपये जास्त जमा झाल्यामुळे आता या निधीबाबत विविध सूचनाही करण्यात येत आहे.


उर्वरित पैशांमधून संपूर्ण अयोध्या शहराचा विकास करावा, असा सल्ला काही संतांनी दिला आहे. तर तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी सीतामाईच्या नावानं अयोध्येत संस्कृत विद्यापीठ सुरू करावं, असं सुचवलं आहे. शहरात प्रत्येका मोफत दूध देता यावं, यासाठी गोशाळा स्थापन करावी, असंही परमहंस दास यांनी म्हटलं आहे. निर्मोही आखाड्याचे महंत धनेंद्र दास यांनी अयोध्येतल्या अन्य मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी वापरला जावा, अशी सूचना केली आहे. 


या अतिरिक्त निधीचा विनियोग कसा करायचा, याचा निर्णय अर्थातच ट्रस्ट घेईल. मात्र या निमित्तानं देशवासियांची रामभक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झालीये. रामजन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच राममंदिराच्या निधीसाठी झालेल्या या छोटेखानी आंदोलनालाही यश मिळाल्याचं स्पष्ट दिसतं आहे.