Shimla:  जगभरातील आणि प्रामुख्याने भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील शिमला (Himachal Pradeh Shimla) या ठिकाणी पर्यटकांचा ओघ कायमच पाहायला मिळतो. फक्त भारतीय नव्हे, तर अनेक परदेशी पर्यटकही या ठिकाणाला सातत्यानं भेट देताना दिसतात. पण, निसर्गाच्या कुशीत दडलेलं हेच ठिकाण येत्या काळात जमीनदोस्त होण्याचा धोका आता आणखी बळावताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या निरीक्षणात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टीनुसार शिमला येत्या काळात संकटाच्या गर्त छायेत अडकणार असून, हिमालय क्षेत्रामध्ये वाढता मानवी वावर या सर्व ऱ्हासाचं मुख्य कारण ठरणार आहे.  


हिमाचल आणि प्रामुख्यानं शिमल्यातील पर्वतीय क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांपासून मानवी वावर आणि येथील निसर्गात मानवी हस्तक्षेप सातत्यानं वाढताना दिसत आहे. तीस हजारांची क्षमता असणाऱ्या या शिमल्यात सध्याच्या घडीला जवळपास तीन लाखांहून अधिक लोकसंथ्या असून, याच कारणास्तव भूपृष्ठावरील भार सातत्यानं वाढत असून, यामुळं पर्वतीय भाग खचत असल्याची भयावह बाब निदर्शनास आली आहे. 


पर्वत, डोंगर पोखरून, कापून तयार केले जाणारे रस्ते आणि इथं होणारं बांधकाम,  वनांची तोड यामुळं शिमल्याच्या भूगर्भात एक पोकळी तयार होत असल्याचं आढळलं आहे. भौगोलिकदृष्ट्या शिमल्याचं स्थान हे अतिशय महत्त्वातं असून, तो सध्याच्या स्थितीला गंभीर संकटात अडकलेल्या हिमालय पट्ट्यामध्ये मोडतो. इथं अनेकदा भूकंपाचे सौम्य झटकेही जाणवत असून, भूस्खलनाच्या घटनांमध्येही सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. जागतिक तापमानवाढीमुळं इथं पर्वतीय भागांमध्ये साठलेल्या बर्फाचं पाणी होऊन हिमनद्या मैदानी क्षैत्रांच्या दिशेनं प्रचंड वेगानं वाहत येत असल्यामुळं जमिनीची धूपही होत आहे. इतकंच काय तर, नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही संकटांना तोंड देणाऱ्या शिमलामध्ये सध्या काहीही योग्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. 


हेसुद्धा वाचा : VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे


 


इथं असणाऱ्या ऐतिहासिक रिज मैदानामध्येही मोठाले तडे गेल्यामुळं शिमला गंभीर संकटात असल्याची जाणीव येथील स्थानिकांनाही झाली आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर असणाऱ्या या ठिकाणाची उंची सातत्यानं कमी होत असून, शिमला खचत असल्याची बाब भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल देत आहे. अनेक संकटं शिमल्याला विळखा घालत असतानाच आता इथं स्थानिकांनी आणि पर्यटकांनीही सावधगिरी बाळगत निसर्गाचा इशारा गांभीर्यानं घेण्याची वेळ आली आहे असंच हवामान विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे. 


महाराष्ट्रातील पाचगणीसुद्धा धोक्यात? (Maharashtra Panchgani)


उत्तराखंडमधील जोशीमठ, हिमाचलमधील शिमला आणि त्यामागोमाग येत्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असणारं पाचगणीसुद्धा अशाच संकटाचा सामना करू शकते असा अंदाज कैक दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी वर्तवला होता. शिमल्यातील या संकटामुळं याच अंदाजानं पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. उत्तराखंडचं जोशीमठ आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणच्या भूगर्भात बरंच साम्य असल्यामुळं तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केली होती. इथंही वाढता मानवी हस्तक्षेप आणि निसर्गाच्या नियमांची पायमल्ली करत होणारं बांधकाम विनाशाचं मुख्य कारण ठरू शकतं. त्यामुळं वेळीच सावध झालेलं बरं!