ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो...
Bank News : बँकेकडून ज्याप्रमाणं ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना काही नियम आखून दिले जातात त्याचप्रमाणं इतर व्यवहारांसाठीचे नियमही लागू करण्यात येतात. पण, यातले काही नियम मात्र कोणालाच ठाऊक नसतात.
ATM Rules : एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेलं असता कधी तुम्हाला फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा मिळाल्या आहेत का? ATM मधून फाटलेल्या नोट्या आल्यावर, आता नेमकं काय करावं? हाच प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या नोटा कुठंतरी खर्च करून संपवण्याचा प्रयत्न सुरु होतो. पण, तिथंही अनेकांना अपयश येतं. कारण, फाटलेल्या नोटा सर्वच दुकानदार स्वीकारतात असं नाही.
तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलू शकता. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंच त्यासाठीचा नियम आखून दिला आहे. ज्यानुसार जर एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या, तर बँकेला त्या बदलून द्याव्या लागतील. यासाठी फार क्लिष्ट प्रक्रिाही नाहीये, त्यामुळं अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही नोट बदलून घेऊ शकता.
नोट बदलण्यासाठी नेमकं काय करावं?
फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलण्यासाठी तुम्ही पैसे काढलेलं एटीएम ज्या बँकेचं आहे तिथं जा. तिथं जाऊन तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे. अर्जात तुम्ही पैसे काढण्याची तारीख, वेळ आणि तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढले आहेत त्याचं नावही नमूद करा. या अर्जासोबत तुम्ही पैसे काढल्याच्या स्लिपची एक प्रत जोडा. स्लिप घेतली नसल्यास मोबाईल ट्रांजॅक्शनची माहिती द्या.
हेसुद्धा वाचा : Mumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
बँकेकडे सर्व माहिती सुपूर्द केल्यानंतर तुम्हाला तातडीनं नोटा बदलून दिल्या जातील. 2017 मध्ये आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार फाटलेल्या, जीर्ण नोटा बदलण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही. त्यामुळं ग्राहकांनी याची दखल घ्यावी.
RBI च्या नियमांनुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 नोटा एकाच वेळी बदलू शकतो. या नोटांची जास्तीत जास्त किंमत 5000 रुपये इतकी असणं बंधनकारक आहे. हो, पण इथंही नोटा बदलता येत नाहीत अशाही काही अटी आहेत. अशा नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा केल्या जातात.
RBI च्या नियमावलीनुसार एटीएममधील अशा नोटा बदलण्याची जबाबदारी पूर्णत: बँकांचीच असते. ज्या एजेन्सीनं एटीएममध्ये नोटा जमा केल्या आहेत त्यांचीही ही जबाबदारी नसते. नोटांमध्ये असणाऱ्या त्रुटी बँक कर्मचाऱ्यांनी पडताळून पाहाव्यात. नोटीवर अनुक्रमांक, महात्मा गांधी यांचं वॉटरमार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसत असेल तरच ही नोट बदलण्यात येते.