लग्नात तलवारीने घेतला तरुणाचा जीव
लग्नसमारंभात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. सर्वत्र ढोल-ताशाच्या आवाजात आणि गाण्यांवर वऱ्हाडी मंडळी नाचताना दिसत आहेत. अशाच प्रकारे एका लग्नसमारंभात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
लग्नसमारंभात कुणी तलवार घेऊन नाचतं तर कुणी बंदूक. लग्नसमारंभात बंदूकीची गोळी चालवल्याने आतापर्यंत अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. असाच काहीसा प्रकार हैदराबादमध्ये घडल्याचं समोर आलं आहे.
हैदराबादमधील शियाकपट परिसरात शुक्रवारी लग्नसोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता. प्रत्येकजण आनंदात नाचतही होता. मात्र, याच दरम्यान एक दुर्घटना झाली आणि एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...
लग्नात हमीद नावाचा एक तरुण तलवार घेऊन नाचत होता. हमीद नशेत होता. नाचता-नाचता त्याचा तोल गेला आणि तो थेट तलवारीवर कोसळला.
तलवारीवर कोसळलेला हमीद गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी जुनैद नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.