नवी दिल्ली: एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. माझ्याऐवजी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. ते शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'भारत बचाव' आंदोलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी काय केले, देशात मंदी आणली आणि ईशान्येकडील प्रदेशात आग लावली - राहुल गांधी


राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंड येथील प्रचारसभेत हे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा संदर्भ देत मोदी सरकारवर आसूड ओढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची हाक दिली होती. मात्र, देशातील आजची परिस्थिती पाहता त्याचे रूपांतर 'रेप इन इंडिया'त झाल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरले होते. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती.




मात्र, राहुल गांधी माफी मागायला सपशेल नकार दिला. मी काहीही चुकीचे बोललो नव्हतो. जे सत्य आहे, तेच बोललो होतो. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. काँग्रेसवाले 'बब्बर शेर' आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.