कोरोनातून बऱ्या झालेल्या तबलिगीने मानले डॉक्टरांचे आभार, म्हणाला...
मुस्लिम बांधवांनीही सरकारच्या नियमांचे पालन करावे.
अमरावती: काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार ठरवण्यात आलेल्या तबलिगी जमातचा एक सकारात्मक चेहरा आता समोर येताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेल्या हरयाणाच्या एम्स रुग्णालयातील अर्शद अहमद याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्शद अहमद महाराष्ट्रातील अमरावती येथील तबलिगी जमातचा सदस्य आहे. कोरोनातून बरे झालेल्या अर्शदने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
दिल्लीच्या मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमावरून परतल्यानंतर अर्शदला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्याला झझ्झर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी झालेल्या उपचारानंतर अर्शद कोरोनातून पूर्णपणे बरा झाला. एवढेच नव्हे आतापर्यंत त्याने दोनदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. आता डॉक्टरांनी मला दहावेळा प्लाझ्मा डोनेट करायला सांगितला तरी मी तयार आहे, असे अर्शदने 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
'तबलिगींच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण मुस्लिम समुदायाला जबाबदार धरू नका'
यावेळी अर्शदने रुग्णालयातील आपला अनुभवही सांगितला. उपचार सुरु असताना डॉक्टर दिवसातून तीनदा आमची तपासणी करत होते. रुग्णालयातील इतर कर्मचारीही आमची खूप काळजी घेत होते. आम्हाला घरीच असल्यासारखे वाटत होते, असे अर्शदने सांगितले.
देशातील इतर मुस्लिम बांधवांनीही सरकारच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी अर्शदने केले. आपण प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात रमझानची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत न जाता घरीच नमाज करा, असेही अर्शदने सांगितले.
दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये मार्च महिन्यात धार्मिक परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला परदेशातूनही काहीजण आले होते. त्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण आपापल्या राज्यात परत गेले. या लोकांच्या माध्यमातून देशातील २३ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे काहीजणांकडून देशातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले होते.