नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून 'तबलिगी जमात'च्या मुद्द्यावरून काही जणांकडून देशातील मुस्लिम समूदायाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुस्लिम समुदायावर टीका करणाऱ्यांना फटकारले. त्यांनी 'पीटीआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, समाजातील एका गटाने गुन्हा केला म्हणून संपूर्ण मुस्लिम समूदायाला जबाबदार धरू नये. 'तबलिगी जमात'च्या कार्यक्रमावर अल्पसंख्याक समाजातील लोकांनीही टीका केली.
देशात १४,३७८ कोरोनाग्रस्त; मरकजमुळे २३ राज्यात व्हायरसचा फैलाव
अनेक मुस्लिमांनी तबलिगी जमातविरोधात कारवाईची मागणीही केली. त्यामुळे 'जमात'च्या कृत्यासाठी सरसकट सर्व मुस्लिमांवर टीका होता कामा नये. मुस्लिमांवर टीका करणारा आणि त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणारा एक ठराविक वर्ग आहे. आपण एकी दाखवून अशा लोकांना एकटे पाडले पाहिजे, असे आवाहन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमासाठी परदेशातून आलेल्या काही लोकांमुळे इतरांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण आपापल्या राज्यात परत गेले. या लोकांच्या माध्यमातून देशातील २३ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे काहीजणांकडून देशातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले होते.
पाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन
काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुस्लिम व्यक्तीला दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर भारतात इस्लामफोबियाचे प्रमाण वाढू लागल्याची टिप्पणी 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन'कडून करण्यात आली होती. मात्र, भारत हा मुस्लिमांसाठी नंदनवदन असल्याचेही या संस्थेने म्हटले होते. जे लोक हे वातावरण बिघडवत असतील ते आमचे मित्र असू शकत नाही, असेही 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन'ने म्हटले होते.