...तर भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये आणखी आतमध्ये शिरेल
पाकिस्तानने आपल्या भूभागातील दहशतवादी तळ बंद केले पाहिजेत.
नवी दिल्ली: पाकिस्तानने दहशतवादाला आळा घातला नाही तर भारतीय सैन्याला पाकिस्तानमध्ये आणखी आतमध्ये शिरून कारवाई करावी लागेल, असा इशारा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला. त्यांनी सोमवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, पाकिस्तानने आपल्या भूभागातील दहशतवादी तळ बंद केले पाहिजेत. मात्र, तसे न झाल्यास भारतीय सैन्याला पाकिस्तानमध्ये आणखी आतवर जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करावे लागतील, असे मलिक यांनी म्हटले.
भारतीय सैन्याने रविवारी नियंत्रण रेषेलगत असणाऱ्या तंगधार परिसरात केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. याठिकाणी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून चार दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. तसेच भारतीय सैन्याने उखळी तोफांचा जोरदार माराही केला होता. यामध्ये जवळपास २२ दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करातील पाच ते सहा जवान ठार झाल्याचे समजते.
निवडणुकीच्या काळात सर्जिकल स्ट्राईक हा पॅटर्न झालाय; काँग्रेसचा आरोप
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय लष्कराला पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. घुसखोरी न थांबल्यास भारताकडून असेच हल्ले करण्यात येतील. भारतीय सैन्य पाकिस्तानबाबत कोणतीही दयामाया बाळगणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.