भारतात योग्य वेळेत लॉकडाऊन करण्यात आला- केंद्रीय आरोग्यमंत्री
`भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले`
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले, असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. अनेक विकसित देशांनी लॉकडाऊन लागू करण्यासाठी बरेच दिवस वाया घालवले, काही देशांनी ज्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली त्यावेळी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनपूर्वी भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर 3.4 दिवसांच्या दरम्यान होता. मात्र आज कोरोना रुग्ण वाढीचा दर 13 दिवसांपेक्षा अधिक आहे, असे ते म्हणाले
भारतात लॉकडाऊन एखाद्या लसीप्रमाणे परिणामकारक ठरला असून लॉकडाऊन आणि लॉकडाऊन दरम्यान सुरु असलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनी, अतिशय सामर्थ्यवान सामजिक लस म्हणूनच काम केले असल्याचे, आरोग्यमंत्री म्हणाले.
देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले. बस, ट्रेन, दुकानं आणि इतर काही गोष्टी, निर्बंधांसह, काही अटी-शर्तींसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1 लाख 31 हजार 868वर पोहचला आहे. तर आतापर्यंत भारतात 3,867 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 54 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसविरोधात जगभरात लढाई सुरु आहे. वेगात पसरणाऱ्या या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.