Virender Sehwag On Adani Hindenburg Dispute: भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये सुरु असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केलं आहे. त्याने सध्या शेअर बाजारामध्ये (Share Market) सुरु असलेली चढ उतार म्हणजे नियोजित कट असल्याकडे इशारा केला आहे. सेहवागने सोमवारी एक ट्विट केलं. ज्यामद्ये त्याने थेट हिंडनबर्ग रिपोर्टचा उल्लेख न करता भारतीयांची प्रगती बाहेरील देशांमधील लोकांना सहन होत नाही असं म्हटलं आहे. 


सोशल मीडिया पोस्टमुळे सेहवाग असतो चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवाग कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. मग हटके पद्धतीने केलेलं एखाद्या प्रोडक्टचं प्रमोशन असो, सामन्यानंतर नोंदवलेली उत्साही प्रतिक्रिया असो किंवा एखाद्या घटनेसंदर्भात सूचक पद्धतीने केलेलं भाष्य असो सेहवागचा शाब्दिक स्ट्रेट हीट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरतो हे मात्र खरं. सेहवाग नेहमी त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ताज्या घडामोडींबद्दल आपली मतं रोकठोकपणे मांडत असतो. त्याने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनाबाहेर काढण्याच्या निर्णयाचंही कौतुक केलं होतं. सध्या त्याचं असच एक ट्वीट चर्चेत असून सूचक पद्धतीने त्याने उद्योजक गौतम अदानी आणि हिंडनबर्ग रिपोर्ट (Adani-Hindenburg Issue) प्रकरणावर भाष्य केलं आहे.


सेहवाग नेमकं काय म्हणाला?


भारतीय बाजारपेठेमधील सध्याची परिस्थिती म्हणजे नियोजित कटाचा भाग वाटत आहे, असंही सेहवागने म्हटलं आहे. कितीही प्रयत्न करा नेहमी प्रमाणे भारत अधिक मजबूत होऊन यामधून बाहेर निघेल, असा विश्वास सेहवागने व्यक्त केला आहे. "गोऱ्यांना भारताची प्रगती पहावत नाही. सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये सुरु असलेला प्रकार हा पूर्वनियोजित वाटतोय. कितीही प्रयत्न करा पण नेहमीप्रमाणे भारत अधिक मजबूत होऊन यामधून निघेल," अशा शब्दांमध्ये सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




अदानी म्हणाले देशावर हल्ला


गौतम अदानींच्या ग्रुपवर आर्थिक संशोधन करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने गंभीर आरोप केले आहे. "भारत आणि भारतामधील संस्था तसेच विकासावर करण्यात आलेला हा सुनियोजित हल्ला आहे," असं उत्तर अदानी ग्रुपने हिंडनबर्ग अहवालासंदर्भात पहिली प्रतिक्रिया देताना दिलं आहे. "खोटी माहिती सोडून यामध्ये काहीच नाही," असंही अदानी ग्रुपने म्हटलं आहे. अदानी ग्रुपने आपल्या 413 पानांच्या रिप्लायमध्ये हिंडनबर्ग रिपोर्टला, "खोट्या माहितीच्या आधारे छापण्यात आलेला अहवाल" असं म्हटलं आहे. अमेरिकी कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोपही अदानी ग्रुपने केला आहे.