कोईम्बतूर : भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट भागात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर सहा दिवसांनी वायुदलाची स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्यात आली. कोईम्बतूर येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत वायुदल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी काही महत्त्वाचे मुद्दे माध्यमांसोमर स्पष्ट केले. बालाकोट येथे एअर स्ट्राईक झाला असून, यामध्ये दहशतवादी तळांवर निशाणा साधला गेल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या ठिकाणाला निशाणा करुन तेथे हल्ला करण्याचं ठरवण्यात आल्यानंतरच आम्ही त्यावर निशाणा साधतो. आणि इथे आम्ही तो साधला. नाहीतर पाकिस्तानने या प्रकरणी वक्तव्य का केलं असतं? असा प्रश्न धानोआ यांनी उपस्थित केला. भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी काही विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं होतं. ज्यांना धानोआ यांनी पूर्णविराम दिला.






वायुदलाने ठरलेल्या ठिकाणी हल्ला करत शत्रूला उध्वस्त केलं असल्याचं म्हणत या हल्ल्यात एकूण किती दहशतवादी ठार झाले याविषयीचा अधिकृत आकडा सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. याविषयीची माहिती सरकारकडून देण्यात आल्याचं म्हणत मृतदेहांची मोजदाद हे आमचं काम नसल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांच्या ताफ्यात आता मिग २१ चा समावेश करण्याच्या मुद्द्यावरुनही अनेकांचा विरोध असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण, मिग २१ बायसन ही लढाऊ विमानं सर्व दृष्टीने सक्षम असल्याचं म्हणत त्यांनी या विमानांमध्ये उत्तम दर्जाची शस्त्रप्रणाली असल्याचीही माहिती दिली. 


'सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल या अद्ययावत कार्यप्रणाली असणाऱ्या लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे', ही महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान भारतात परतल्यानंतर त्याविषयी होणाऱ्या राजकारणावर आणि राजकीय चर्चांवर वक्तव्य करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. तर सध्याच्या घडीला त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून प्रकृतीत सुधार आल्यानंतर ते वायुदलाच्या सेवेत पुन्हा रुजू होऊ शकतील अशी आशाही वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली.