चालाख चोर! पोलिसांना चकमा देत पळाला, दीड तासांनी कपडे बदलून पुन्हा त्याच घरात चोरी.. Video व्हायरल
Viral Video : चोरीची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका घरात घुसलेला चोर पोलिसांना चकमा देत घटनास्थळावरुन फरार झाला. पण धक्कादायक म्हणजे दीड तासाने कपडे बदलून चोराने पुन्हा त्याच घरात चोरी केली.
Viral Video : चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. अनेक घटनांमध्यो पोलीस चोरांना (Theft) पकडण्यात यशस्वी होतात. तर काही घटनांमध्ये चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. एका घरात घुसलेला चोर पोलिसांना चकमा देत घटनास्थळावरुन फरार झाला. पण धक्कादायक म्हणजे दीड तासाने कपडे बदलून चोराने पुन्हा त्याच घरात चोरी केली.
काय आहे नेमकी घटना?
चोरीची ही घटना पंजाबमधल्या जालंधर (Jalandhar) इथली आहे. जालंधरमधल्या एका घरात झालेल्या चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. जालंधरमधील श्री गुरु गोविंद सिंह एवेन्यू हा इथला उच्चभ्रू परिसर आहे. इथल्या एका घरात दिवसाढवळ्या एक चोर घुसला. आसपासच्या लोकांना चोर घरात शिरल्याचा संशय आहे. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चोराला शरणागती पत्करण्याचं आव्हान केलं.
घराच्या गेटबाहेर साध्या वेशातील पोलिसांचा ताफा उभा राहिला. चोराने भिंतीवरुन उडी मारत घराच्या बाहेर पडला, पोलीस त्याला पकडणार असं वाटत असतानाच. चोराने पोलिसांनी धक्का देत तिथून पळ काढला. चोराला पकडण्यासाठी पोलीसही त्याच्या मागे पळाले. पण चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या सर्व प्रकारात एक पोलीस कर्मचारी जमिनीवरही पडला.
कपडे बदलून चोर पुन्हा आला
चोराला पकडण्यात अपयशी ठरलेले पोलीस घटनास्थळावरुन निघून गेले. याचा फायदा घेत तोच चोर दीड तासांनी पुन्हा कपडे बदलून पुन्हा त्याच घरात चोरी करण्यासाठी शिरला. भिंतीवरुन उडी मारत तो पुन्हा घरात घुसला. हा सर्व प्रकार शेजारच्या घराजवळ लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. ज्या घरात चोर घुसरला त्या घरात केवळ दोन वृद्ध राहातात, त्यांची मुलं कामानिमित्ताने परदेशात स्थायिक झाल्याची माहिती शेजारच्यांनी दिलीय. या घरात चोराने किती मुद्देमाल लंपास केला याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
विशेष म्हणजे दुसऱ्यांदा चोरी करुन पळतानाही शेजारच्यांनी पाहिलं. पण दुसऱ्यावेळीही त्याला पकडण्यात अपयश आलंय. या संपूर्ण घटनेची रामामंडी पोलीस तपास करत आहेत. चोरांना पोलिसांचाही धाक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिक देत असून या घटनेने भीतीचं वातवरण परसरलं आहे. लोकांनी या ठिकाणी पोलीस पेट्रोलिग वाढवण्याची मागणी केली आहे.