नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावली असली तरी ही मंदी नव्हे, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी केले आहे. मोदी सरकारकडून शनिवारी संसदेत Union budget 2020 सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी म्हटले की, २०१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग अचानकपणे मंदावला. नोटबंदी, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांना बसलेला झटका यासारखे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे सध्याची अवस्था म्हणजे मंदी नव्हे, असे ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी स्पष्ट केले. 


Budget2020 : आज निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प


तसेच आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.८ टक्क्यांच्या आसपास राहील. यानंतर २०२१ मध्ये विकासदर ६.५ टक्क्यांपर्यंत उसळी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प शनिवारी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेपुढे मांडतील. त्याला आर्थिक आघाडीवरील कमालीच्या औदासीन्याची पार्श्वभूमी आहे. मंदीमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. 


Budget 2020: अर्थसंकल्पाविषयीच्या 'या' पाच रंजक गोष्टी माहिती आहेत का?


तत्पूर्वी शुक्रवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ६ ते ६.५ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारच्या पोतडीतून कोणत्या उपाययोजना बाहेर काढल्या जाणार, याची प्रतिक्षा सर्वांना आहे.