नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प शनिवारी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेपुढे मांडतील. त्याला आर्थिक आघाडीवरील कमालीच्या औदासीन्याची पार्श्वभूमी आहे. मंदीमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ६ ते ६.५ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारच्या पोतडीतून कोणत्या उपाययोजना बाहेर काढल्या जाणार, याची प्रतिक्षा सर्वांना आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी सामान्य माणसांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असतात. त्यामुळे साहजिकच लोकांना अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता असते. यापूर्वी सादर करण्यात आलेले अर्थसंकल्प वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा घटनांमुळे चर्चेचा विषय राहिले.
अर्थसंकल्पाविषयीच्या 'या' पाच रंजक गोष्टी
१. १९९१ साली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना १८,६५० शब्द असलेले सर्वात जास्त वेळ चाललेले अर्थसंकल्पाचे भाषण केले.
२. प्रणव मुखर्जी यांनी सातवेळा अर्थसंकल्प सादर केला. तर डॉ. मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा आणि अरूण जेटली यांनी सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
३. १९५९ साली अर्थमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक जास्त म्हणजे १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
४. निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
५. आर. वेंकटरामन हे एकमेव अर्थमंत्री होते, ज्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला.