Bihar Train Accident:  बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.ट्रेनच्या शंटिंग ऑपरेशन दरम्यान  रेल्वे कर्मचाऱ्याचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला. लखनौहून आलेल्या लखनौ-बरौनी एक्स्प्रेस क्रमांक 15204 चा डबा वेगळा करत असताना हा अपघात घडला. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दु:ख व्यक्त केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला. दोन डब्यांमधील कपलिंग उघडणारा रेल्वे पोर्टर अचानक घसरल्याने रेल्वेच्या मधोमध गंभीररित्या चिरडला गेला. यात रेल्वे पोर्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी काही प्रवासी त्यांच्या मोबाईलवरून फोटो काढत होते. ज्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. अमर कुमार राव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते रेल्वे पोर्टर म्हणून काम करत होते.


लिंक उघडताच कर्मचारी मध्येच चिरडला


अमर कुमार राव हे  सोनपूर रेल्वे विभागांतर्गत स्टेशनवर तैनात होते. ते रेल्वे पोर्टर म्हणून नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत होते.  लखनौ-बरौनी एक्स्प्रेस फलाटावर उभी राहिल्यानंतर राव यांनी डब्यांमधील कपलिंग उघडण्यास सुरुवात केली. राव हे दोन डब्यांना जोडणाऱ्या लोखंडी बीममध्ये होते त्यावेळी अचानक गाडी इंजिनच्या बाजूने मागे सरकली. यामुळे राव दोन लोखंडी सळईंमध्ये चिरडले गेले.


चालकाने घटनास्थळावरून काढला पळ 


रेल्वेचे कुली लोखंडी बीममध्ये चिरडलेले पाहून मोबाईलवरून फोटो क्लिक करणाऱ्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. आवाज ऐकून रेल्वे चालकाने रेल्वे इंजिन मागे घेण्याऐवजी खाली उडी मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिन हलवून अमरकुमार राव यांना डब्यांमधून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अमर कुमार राव यांचा जागीच मृत्यू झाला होता.


रेल्वेकडून चौकशीचे आदेश 


या अपघातासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. परंतु या संपूर्ण घटनेसाठी चालकाला जबाबदार धरले जात आहे.गाडी मागे सरकण्यापासून रोखली नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे. रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.