IRCTC Special Trains : प्रवाशांच्या सेवेसाठी कायमच तत्पर असणाऱ्या आणि देशाच्या विविध गावांना, राज्यांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं समाजातील एका वर्गाला मोठा फायदा होताना दिसणार आहे. रेल्वे विभागाकडून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार स्थलांतरीत मजुरांसाठी दर दिवशी रेल्वे गाड्या सोडण्य़ाचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार स्थलांतरित मजुर आणि अल्प उत्त्पन्न गटातील नागरिकांसाठी नॉन एसीसोबतच जनरल विभागातील रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्या राज्यांमधून मोठ्या संख्येनं नागरिकांची ये-जा सुरु असते आणि ज्या राज्यातील प्रवाशांना सर्वाधिक वेटिंग लिस्टला सामोरं जावं लागतं अशा सर्वांसाठी एका निरीक्षणानंतर या रेल्वेसंदर्भातील निर्णय घेतला गेला आहे. 


रेल्वेच्या या निर्णयामुळं नेमकं काय बदलणार? 


रेल्वे विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांना होणार आहे. कारण, आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे. मुख्य म्हणजे रेल्वे विभागाकडून फक्त ठराविक दिवस किंवा प्रसंगांवरच या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार नसून, त्या दैनंदिन तत्त्वावर प्रवास करणार आहेत. परिणामी या रेल्वे मार्गावर होणारी गर्दीसुद्धा कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून या नव्या रेल्वे नियमित स्वरुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. ज्यामध्ये एलएचबी कोच, स्‍लीपर आणि जनरल कोचचा समावेश असेल. 


हेसुद्धा वाचा : Emergency Alert चा मेसेज सकाळी तुमच्याही मोबाईलवर आला? नेमकं काय घडलंय जाणून घ्या


 


येत्या काळात म्हणजेच नव्या वर्षात रेल्वे विभाग पश्चिम बंगाल, पंजाब, आसम, गुजरात, दिल्ली, तमिलनाडु, महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, छत्तीसगढ़ येथे या नव्या रेल्वे गाड्यांसाठी योजना आखत आहे. मजदूर, विविध क्षेत्रांमधील कारागिर आणि तत्सम प्रवाशांना यामुळं मोठा फायदा होऊन रोजगाराच्या निमित्तानं त्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. 


नव्यानं धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना खेडोपाड्यांमधून सहजपणे महानगरांपर्यंत पोहोचता येणार आहे. विविध कारणांनी ही मंडळी महामार्गांवरून स्वगृहीसुद्धा पोहोचू शकमार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये किमान 22 ते कमाल 26 कोच असतील असं म्हटलं जात आहे. पूर्वनियोजित आरक्षणांच्या माध्यमातून या रेल्वेमधील तिकीट प्रवासी मिळवू शकतात.