Vande Bharat : भारतीय रेल्वेला (Indian Railway) एका नव्या स्तरावर नेणाऱ्या वंदे भारत या वेगवान रेल्वेनं आतापर्यंत प्रवाशांच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रवासवेळेत मोठ्या फरकानं होणारी बचत, पाहया अनेकांचीच या रेल्वेला पसंती. खिशाला परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रवासाची हमी देणाऱ्या याच वंदे भारतनं आता एक नवा टप्पा ओलांडला असून लवकरच प्रवाशांना या रेल्वेसेवेचा नवा स्तर अनुभवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमीत कमी वेळेत मोठं अंतर ओलांडून प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या या वंदे भारतसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. या माहितीनुसार येत्या काळात या अतिजलद रेल्वेगाडीचा वेग वाढवण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या घडीला वंदे भारत ताशी 130 किमी इतक्या वेगानं धावते. येत्या काळात हाच वेग ताशी 160 किमी पर्यंत नेण्यात येणार असून, रेल्वेच्या वेगमर्यादेअंतर्गत राहूनच हे प्रयत्न सुरु आहेत. ज्यासाठी पश्चिम रेल्वेनं वंदे भारत तिच्या सर्वाधिक वेगानं चालवण्याची परवानगीसुद्धा दिली आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यान ही ट्रायल रन घेण्यात येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : IPL 2024 : रतन टाटांच्या नावानं व्हायरल झालेल्या 'त्या' शब्दांनी पालटलं मयांक यादवचं नशीब; काय होत्या त्या ओळी? 


किती फरकानं कमी होणार प्रवासाचा वेळ? 


ट्रायल रनमध्ये वंदे भारत ट्रेनचा वेग 130 किमी वरून 160 किमी करण्यात येणार आहे. ही ट्रायल रन यशस्वी ठरल्यास मुंबई ते अहमदाबादमधील प्रवासाचं अंतर साधारण 45 मिनिटांनी कमी होणार आहे. म्हणजेच जिथं आता हे अंतर ओलांडण्यासाठी 5 तास 25 मिनिटांचा वेळ लागतो तिथं नवी वेगमर्यादा लागू झाल्यास ही ट्रेन 4 ते साडेचार तासांमध्येच तुम्हाला अहमदाबादला पोहोचवणार आहे. 


वंदे भारतच्या या ट्रायल रनच्या धर्तीवर सुरक्षेचे काही निकष पाळले जात आहेत. त्यानुसार ही चाचणी दिवसाच्या उजेडात आणि चांगलं हवामान असणाऱ्या दिवशी घेण्यात येणार आहे. चाचणीदरम्यान वाढीव बॅरिगेड्स नसणाऱ्या क्षेत्रांची चाचपणी करून शक्य असेल तिथं पादचाऱ्यांना रेल्वे रुळांनजीक येण्यापासून थांबवण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवत या चाचणीदरम्यान रेल्वे अधिकारीसुद्धा फलाटांवर उपस्थित राहणार आहेत.