वाह! पैसा वसूल रेल्वे प्रवास; या दोस्तांनी 3AC कोचमध्येच सुरु केली सतार- तबल्याची मैफिल, Video Viral
Indian railway viral video : भारतीय इतिहासाप्रमाणंच भारतीय संगीताची पाळंमुळंही फार दूरवर पोहोचली असून, याच भारतीय संगीताची सध्या संपूर्ण जगभरात वाहवा होताना दिसत आहे.
Indian railway viral video : मागील काही दिवसांमध्ये सोशल मडियावर बरेच नकोसे व्हिडीओ व्हायरल झाले. पण, यातही एका व्हिडीओनं मात्र स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं. अनेक वायफळ गोष्टींचे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच हा व्हिडीओ मात्र वारंवार पाहिला जात आहे. अनेकांनी तर, या व्हिडीओमध्ये दिसणारे कलाकार तरुण आहेत तरी कोण, हे शोधण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले आहेत. अर्थात तेसुद्धा सोशल मीडियाच्याच आधारे.
भारतीय रेल्वेतील व्हिडीओ व्हायरल...
प्रवासाला निघालं असता गाण्यांच्या भेंड्या किंवा तत्सम गोष्टींच्या मदतीनं हा प्रवास अधिक रंजक केला जातो. अशा या प्रवासात कोणी प्रत्यक्ष मैफिलच बसवली तर...? तर नेमकं काय होईल याचं उत्तर व्हायरल होणारा व्हिडीओ देतोय.
हेसुद्धा वाचा : पृथ्वीचं तापमान कसं आणि कोणत्या गोष्टीनं मोजलं जातं?
भारतीय रेल्वे प्रवासादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. व्हिडीओमध्ये 3AC कोचमधून प्रवास करत असताना काही तरुणांनी त्यांच्या कलेचा अप्रतिम नजराणा सादर केल्याचं इथं पाहायला मिळत आहे.
सतार आणि तबल्याच्या साथीनं रंग धरलेल्या या मैफिलीमध्ये फक्त त्या रेल्वेच्या कोचमधील प्रवाशांचच नव्हे, तर इंटरनेटवरील अनेक संगीतप्रेमींचंही लक्ष वेधलं जात आहे. पसूरी या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या गाण्याची धुन या कलाकारांनी सादर केली असून, त्यांनी छेडलेले सूर नेटकऱ्यांची दाद मिळवून जात आहेत. एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टला जायचं म्हटलं की बऱ्याचदा मोठी रक्कम मोजावी लागते. पण, इथं मात्र या तरुणांनी सहप्रवाशांना एका आगळ्यावेगळ्या कॉन्सर्टचाच अनुभव दिला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
उपलब्ध माहितीनुसार हा व्हिडीओ मुंबईहून जळगावला जाणाऱ्या रेल्वेतील असून, कलाकारांच्या या अनोख्या सादरीकरणामुळं सहप्रवाशांनाही एका अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव इथं घेता आला. तुम्ही प्रवासादरम्यान असा एखादा अनुभव घेतला आहे का?