Indian Railways : लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी
नवी दिल्ली : लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे ट्रेननं प्रवास करण्यावर कठोर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता हे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत.
आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडिंग मिळणार आहे. रेल्वेकडून एसी कोचमधील प्रवाशांना बेडिंगची सुविधा मिळणार आहे. याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 2020 मध्ये एसी कोचमध्ये बेडिंग देणं बंद करण्यात आलं होतं. उशी बेडशीट आणि कांबळ असं एसी कोचमध्ये दिलं जात होतं. आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता हळूहळू रेल्वेनंही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू कऱण्यात येणार आहे. तर रेल्वेनं जनरल तिकीटासाठी देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना स्वत: चादर घेऊन प्रवास करावा लागत होता. मात्र आता रेल्वेकडून ही सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे.
सध्यातरी जेवण आणि बेडिंग याशिवाय इतर सेवा सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना इतर सेवांसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. मात्र जनरल तिकीट मिळणं, बेडिंगची सुविधा यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे.