नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९२,०७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११३६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४८,४६,४२८ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९, ८६, ५९८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३७,८०, १०८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशभरातील ७९,७२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी कोरोनाच्या लढाईत कोणतीही ढिलाई बाळगून चालणार नाही, असे देशवासियांना सांगितले. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी, याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. आपले वैज्ञानिक सर्वांना या संकटातून बाहेर काढतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पुढील वर्षी कोरोनावरील भारतीय लस बाजारपेठेत येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. कोरोनावरील लस कधी येणार, याची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, २०२१च्या पहिल्या तिमाहीत ही लस विकसित होईल. लस विकसित झाल्यानंतर ती सर्वप्रथम जीव धोक्यात असलेल्या रुग्णांना दिली जाईल. या लशीसाठी कोण किती पैसे मोजू शकते, हा निकष ग्राह्य धरला जाणार नाही, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले होते.


'पुढच्यावर्षी कोरोनावरील भारतीय लस येईल; विश्वासर्हतेसाठी मीच पहिल्यांदा टोचून घेईन'


सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३९१ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.८१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ६४ हजार ८४० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ३७ हजार ७६५ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.