नवी दिल्ली: कोरोना व्हायरसवरील भारतीय लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत विकसित होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन व्यक्त केला. तसेच या लसीच्या विश्वासर्हतेविषयी शंका असल्यास सर्वप्रथम मी ही लस टोचून घेईन, असेही त्यांनी सांगितले. ते रविवारी 'संडे संवाद' या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती, केंद्र सरकार त्यासाठी करत असलेल्या उपाययोजना आणि कोविडनंतर असणारी जागतिक परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कोरोनावरील लस कधी येणार, याची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, २०२१च्या पहिल्या तिमाहीत ही लस विकसित होईल. लस विकसित झाल्यानंतर ती सर्वप्रथम जीव धोक्यात असलेल्या रुग्णांना दिली जाईल. या लशीसाठी कोण किती पैसे मोजू शकते, हा निकष ग्राह्य धरला जाणार नाही, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
या लशीसाठी होणाऱ्या मानवी चाचण्यांच्यावेळी योग्य ती काळजी घेतली जात आहे तसेच लसीची निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समूहाकडून देशातील जास्तीत जास्त लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे निर्माण करायची, याची रणनीती आखली जात असल्याचेही हर्ष वर्धन यांनी सांगितले. लशीची सुरक्षा, उपलब्धता, कोल्ड स्टोरेज, उत्पादनाची वेळ-काळ अशा मुद्द्यांवर देखील सखोल चर्चा केली जात आहे.
याशिवाय, कोरोनाची लागण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि प्रकृती चिंताजनक असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी या लशीला तातडीने मंजुरी देण्याचा विचारही सरकार करत आहे. यावर एकमत झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच लशीच्या सुरक्षेची खात्री पटवण्यासाठी वेळ पडल्यास मी सर्वप्रथम स्वत:ला लस टोचून घेण्यास तयार असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.