मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. शनिवारी त्यांनी पुढील कार्यक्रम आणि आखणीविषयी माहिती देत २०२१च्या डिसेंबर महिन्यापर्यंत भारताकडून अंतराळात माणूस पाठवण्याचं लक्ष्य साध्य करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्या दिशेने देशाची पावलं उचलली जात असल्याचंही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्याचं ध्येय पूर्णपणे साध्य झालं नाही. पण, असं असलं तरीही याचा कोणताही परिणाम 'गगनयान' मोहिमेवर होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चांद्रयान २चं ऑर्बिटर पुढील सात वर्षांहून अधिक काळ माहिती पुरवेल असं सांगत या मोहिमेविषयी लँडिंगचा अपवाद वगळता इतर सर्व तर्क अगदी योग्य ठरल्याची माहिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली.



आयआयटी भुवनेश्वर येथील आठव्या पदवीदान सोहळ्यात ते उपस्थित राहिले होते. यावेळी साऱ्यांच्या नजरा सिवन काय बोलणार याकडे लागल्या होत्या. याचवेळी त्यांनी भारताच्या अंतराळवारीविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. 'डिसेंबर २०२१ पर्यंत पहिला भारतीय आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून अंतराळात जाईल. हे आमचं एक महत्त्वपूर्ण लक्ष्य आहे. ज्यावर इस्रो काम करत आहे', असं सिवन म्हणाले. गगनयान मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत यामुळे बऱ्याच क्षेत्रांच पुढे जाण्यासाठी देशाला वाव मिळणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. 



पदवीदान सोहळ्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्लाही दिला. तुम्ही धोका पत्करत नसाल तर, जीवनात काहीतरी महत्त्वपूर्ण गोष्ट मिळवण्याची संधी मिळणारच नाही. पण, तुम्ही विचार करुन धोका पत्करत असाल तर, मात्र तुम्ही अडचणींपासून दूर राहू शकता, असं ते या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. सिवन यांच्या प्रोत्साहनपर भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभवं असणार असं म्हणायला हरकत नाही.