नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत बसलो तर राम मंदिर बांधण्यासाठी आणखी हजार वर्षे लागतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिराचा तिढा सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून राहण्याच्या पर्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.


पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला राम मंदिर बांधण्याच्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे तेथे जाणार आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करत बसलो तर राम मंदिर बांधायला आणखी हजार वर्षे वाट पाहावी लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 


संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात आता काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


सरसंघचालक मोहन भागवत आणि विहिंपसारख्या संघटनांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी यापूर्वीच लावून धरली आहे.


भाजपच्या अनेक नेत्यांनी त्याची री ओढली होती. त्यामुळे राम मंदिराबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारवरील दबाब सातत्याने वाढत आहे.