नवी दिल्ली: भारत-बांगलादेश सीमेवर गुरुवारी बांगलादेशी सैन्याकडून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये विजयभान सिंह या भारतीय जवानाचा मृत्यू झाला असून आणखी एक जवान जखमी असल्याचे कळते. या जवानावर मुर्शीदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BSFने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तीन भारतीय मच्छिमार येथील पद्मा नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी बांगलादेशी सैन्याने त्यांना पकडले. काहीवेळानंतर यापैकी दोन मच्छिमारांना सोडून देण्यात आले. हे दोन मच्छिमार काकमरिचार येथील भारतीय सैन्याच्या चौकीवर आले. आणखी एका मच्छिमाराला सोडण्यासाठी बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशकडून (बीजीबी) BSFच्या जवानांना फ्लॅग मिटिंगसाठी पाचारण करण्यात आले. 


त्यानुसार, BSFचे पोस्ट कमांडर पाच जवानांसह बोटीत बसून पद्मा नदीतील बांगलादेशी सीमेनजीक गेले. यावेळी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये फ्लॅग मिटिंगही पार पडली. मात्र, बांगलादेशी सैन्याने भारतीय मच्छिमाराला सोडण्यास नकार दिला. तसेच बांगलादेशी सैन्याने BSFच्या जवानांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती पाहून BSFच्या जवानांनी बोटीतून पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बांगलादेशी सैन्याकडून BSFच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावेळी हेड कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांच्या डोक्यात गोळी लागली. तर बोट चालवणाऱ्या आणखी एका कॉन्स्टेबलच्या हातावर गोळी लागली. या दोघांनाही तातडीने मुर्शीदाबादच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, याठिकाणी कॉन्स्टेबल विजयभान सिंह यांना मृत घोषित करण्यात आले. 


दरम्यान, या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवरील तणाव कमालीचा वाढला आहे. BSF आणि बीजीबी यांच्यात गेल्या २० वर्षांत कोणतीही चकमक झाली नव्हती. या घटनेबद्दल भारताने बीजीबीच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. यानंतर बीजीवीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.