नवी दिल्ली: सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रावरून संबंधित २३ नेत्यांवर आगपाखड होत असताना आमच्या बचावासाठी एकही नेता मध्ये पडला नाही. एवढेच नव्हे तर आम्ही पत्रात उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली नाही, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संबंधित नेत्यांवर आगपाखड करण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलेला पक्षांतर्गत सुधारणांचा मुद्दा बाजूला पडून काँग्रेसमध्ये नव्याच वादाला सुरुवात झाली होती. 


सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज


या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना म्हटले की, काँग्रेसला सध्याच्या घडीला अधिकृत आणि सच्च्या नेतृत्त्वाची गरज आहे. याबद्दल लवकरात लवकर विचार केला जावा, असेच आम्ही सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. भाजप राज्यघटनेची पायमल्ली करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातो. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर पक्षाच्या घटनेचे पालन केले पाहिजे. यावर आक्षेप कसा घेतला जाऊ शकतो, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. 


… तर काँग्रेस पुढील ५० वर्षे विरोधी पक्षातच बसेल- गुलाम नबी आझाद

तसेच भारतातील राजकारणाचा सर्वांगीण विचार करता प्रामाणिकपणाला महत्त्व आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला सध्या त्याहून अधिक काही हवे आहे. या अधिकच्या गोष्टी म्हणजे सर्वसमावेशकता, ध्येयाप्रतीची निष्ठा आणि गुणवत्ता होय. याशिवाय, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. राजकारण हे असे असायला हवे, असे मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. 

मात्र, आम्ही सोनिया गांधी यांना पत्र पाठवल्यानंतर विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि पक्षसंघटेनकडून गांधी घराण्याचे निष्ठावंत कोण, हे सिद्ध करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे आम्ही पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चाच झाली नाही. खरंतर कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचे स्वागत व्हायला पाहिजे होते. मात्र, त्यावर चर्चा न होता विषय भलतीकडेच गेला. तुम्ही एखाद्या गोष्टीचे तात्पर्य समजावून न घेता त्याची वेळ आणि लिहलेल्या गोष्टींचीच चर्चा करत बसलात तर ते मूळ उद्दिष्टापासून दूर जाण्यासारखे आहे. आम्ही सुचविलेल्या एकाही मुद्द्यावर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली नाही. तरीही आम्हालाच दोषी ठरवले जात आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.