नवी दिल्ली : राजस्थानमधलं काँग्रेस सरकार संकटात सापडलं आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज होऊन दिल्लीत दाखल झाले आहेत. सचिन पायलट यांना काही आमदारांचाही पाठिंबा आहे. तसंच काही आमदार हे हरियाणामध्ये तर काही जण दिल्लीमध्ये पायलट यांच्यासोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजस्थानमधल्या काँग्रेसच्या काही आमदारांचे फोनही बंद असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये नाराज असलेले सचिन पायलट हे ज्योतिरादित्य सिंधियांच्या पावलावर पाऊल टाकणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यातच आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. 


'पक्षाबद्दल मी चिंतेत आहे. घोडे जेव्हा आपल्या तबेल्यातून बाहेर जातील, तेव्हाच आपल्याला जाग येईल का?' असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. कपिल सिब्बल यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कुठेही राजस्थानमधल्या सत्तासंघर्षाचा उल्लेख केलेला नसला, तरी त्यांच्या या ट्विटचं टायमिंग खूप काही सांगून जातंय.



सचिन पायलट नाराज का?


भाजपकडून घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता. सरकार पाडण्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने जो FIR दाखल केला आहे. या प्रकरणात २ भाजप नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे. राजस्थानच्या एसओजीनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळाल्यामुळे सचिन पायलट नाराज झाले आहेत.


२०१८ साली राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा होती. पण गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं. तरीही सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातले वाद कमी होत नसल्याचंच चित्र राजस्थान काँग्रेसमध्ये आहे.