धक्कादायक! SP ला मतदान न केल्याने बलात्कार करुन मुलीची हत्या; आईचा आरोप
Karhal Byelection 2024: मतदानाच्या आदल्या दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती. मतदानाच्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
Karhal Byelection 2024: बुधवारी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या मतदानाबरोबर देशातील काही भागांमध्ये पोटनिवडणुकाही पार पडल्या. उत्तर प्रदेशमधील करहल मतदारसंघामध्येही पोटनिवडणूक झाली. मात्र या निवडणुकीच्या मतदानादरम्यान पोलिसांना एका दलित मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी 23 वर्षांची आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी मंगळवारपासून बेपत्ता होती. बेपत्ता होण्याआधी ती काही स्थानिक लोकांबरोबर दिसून आली होती. मृतदेह सापडल्याचं फोनवरुन कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, मुलगी घरी न परतल्याने मंगळवार रात्रीपासूनच तिच्या घरचे लोक तिचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी या तरुणीचा मृतदेह सापडल्याने तिच्या घरच्यांना मोठा धक्काच बसला आहे. या मुलीच्या आईने केलेल्या दाव्यानुसार, मंगळवारी सायंकाळी समाजवादी पार्टीचा समर्थक प्रशांत यादव आणि त्याचे काही सहकारी त्यांच्या घरी आले होते. "त्यांनी आम्हाला समाजवादी पार्टीला पाठिंबा देण्यास सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही भाजपा समर्थक असून कमळासमोरील बटण दाबणार आहोत," असा दावा पीडितेच्या आईने केला.
बलात्कार केल्याचा आरोप
अशाप्रकारे उघडपणे आपण भाजपाला मत करणार असल्याचं सांगितल्याने प्रशांत यादव चिडल्याचा दावा या महिलेने केला. प्रशांत यादवने आम्हाला धमकावलं. त्याने आम्हाला समाजवादी पार्टीला मतदान न केल्याचं परिमाण भोगण्यास तयार राहा, अशा शब्दांमध्ये धमकावलं होतं, असं ही महिला प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाली. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
भाजपानेही केला हल्लाबोल
उत्तर प्रदेश भाजपाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुनही प्रशांत यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केवळ समाजवादी पार्टीला मतदान करणार नाही या कारणावरुन एका दलित तरुणीची हत्या केली, असा आरोप केला आहे. पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, माझ्या मुलीवर बलात्कार करुन गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी या दाव्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.
अमित मालवीयांकडूनही टीका
भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणावरुन समाजवादी पक्षावर टीका केली आहे. "लाल टोपीतील आरोपींनी केलेलं दुष्कर्म पुन्हा समोर आलं आहे. अखिलेश यादवांच्या गुंडांनी करहलमध्ये दलित तरुणीची हत्या केली. अखिलेश यादवांनी आपल्या पक्षातील गुंडांना आवर घातला पाहिजे. नाहीतर तेथील कायदा सुव्यवस्थेकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असा इशारा मालवीय यांनी दिला आहे.