नेहरु भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते? भाजपा नेत्याच्या विधानामुळे खळबळ, म्हणाले `म्हणूनच नरेंद्र मोदी...`
कर्नाटकमधील भाजपा आमदार बसनगौड पाटील यतनाल (BJP MLA Basanagoud Patil Yathnal) यांनी पंडित जवाहरलाल नेहरु हे देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते असं विधान करत खळबळ उडवली आहे.
कर्नाटकमधील भाजपा आमदार बसनगौड पाटील यतनाल (BJP MLA Basanagoud Patil Yathnal) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करत एक विधान केलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण बसनगौड पाटील यतनाल यांनी हे विधान करताना पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या मनात भीती निर्माण केली होती असं सांगताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
बसनगौड पाटील यतनाल एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, "पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान नव्हते. सुभाषचंद्र बोस हे खरं तर पहिले पंतप्रधान होते". सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या मनात भीती निर्माण केली होती. यामुळेच ते भारत सोडून गेले असं ते म्हणाले आहेत.
माजी केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री म्हणाले आहेत की, “बाबासाहेबांनी पुस्तकात लिहिलं आहे की, उपासमारीच्या आंदोलनांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले नाही. तसंच एका गालावर कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करु असं बोलल्यामुळेही मिळालं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या भीतीमुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं".
पुढे त्यांनी सांगितलं की, "दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज भारत सोडून निघून गेले. जेव्हा भारतात स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस देशाच्या काही भागात पहिले पंतप्रधान होते. त्यांच्याकडे त्यांचं स्वत:चं चलन, झेंडा आणि राष्ट्रगीत होतं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरु नव्हे तर सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचं सांगतात".
बसनगौड पाटील यतनाल यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ऑगस्टमध्ये ते म्हणाले होते की, कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसचे सरकार 6-7 महिन्यांत कोसळेल. काँग्रेसचे संभाव्य पतन हे भांडणामुळे होईल आणि भाजप राज्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करेल असा दावा त्यांनी केला होता.
काही दिवसांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपामधून राजीनामा दिला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात बोस यांनी पक्षात राहणं आता माझ्यासाठी अशक्य आहे असं लिहिलं होतं.
आपल्या प्रयत्नांनंतरही सुभाषचंद्र बोस आणि सरतचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडून केंद्र किंवा राज्य स्तरावर कोणतंही समर्थन मिळालं नाही असा आरोप त्यांनी केला होता. चंद्र बोस यांनी 2016 मध्ये भाजपात प्रवेश केला होती. माजी टीएमसी खासदार आणि इतिहासकार सुगाता बोस यांनी सांगितले होतं की त्यांचे आजोबा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू शरत बोस यांनी अखंड भारतात अखंड बंगालची मागणी केली होती.